अहमदनगर जिल्ह्याचा भूगोल

भूगोल

राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड ; पूर्व व आग्नेयेस उस्मानाबाद; दक्षिणेस सोलापूर ; तर नैऋत्येस व पश्र्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांत सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगामध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. याची उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्र्चंद्राचे डोंगर या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बालाघाटचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घोडनदी, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरी, भीमा, सीना, मुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, ढोरा, घोडनदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्र्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात होतो, या स्थळाला प्रवरासंगम असे म्हटले जाते.
अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.

मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातूनच अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्र्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.
नगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.
जिल्ह्याचा लोकसंख्याविषयक तपशील पुढे दिलेला आहे
क्र. तपशील संख्या
१ क्षेत्रफळ १७,०४८ चौ. कि. मी.
२ लोकसंख्या ४०,४०,६४२
३ पुरुष २०,८३,०५३
स्त्रिया १९,५७,५८९
४ ग्रामीण ३२,३६,९४५
शहरी ८,०३,६९७
५ स्त्री-पुरुष गुणोत्तर १००० : ९४०
६ एकूण साक्षरता ७५.३०%
पुरुष ८५.७०%
स्त्रि ६४.३५%







  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved