अष्टविनायकांपैकी एका गणपतीचे- श्री सिद्धिविनायकाचे- स्थान कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आहे. येथील उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर खुद्द नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शेवगाव तालुक्यात आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती प्रसिद्ध आहे. झोपलेल्या अवस्थेतील गणपतीची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहेच, शिवाय काही मुस्लीमही या गणपतीचे भक्त आहेत हे विशेष.
शनि-शिंगणापूर हे स्थान नेवासे तालुक्यात असून, भारतात याची कीर्ती वाढत आहे. येथे श्री शनिदेवाचे मंदिर नसून, उघड्या चौथर्याधवर (शनिदेवरूपी) शिळा आहे. या गावातील घरांना दरवाजे नाहीत, तसेच घरातील कपाटांना कुलुपे नाहीत, येथे चोरी होत नाही. शनि-अमावास्येला येथे भाविक प्रचंड संख्येने शनी दर्शनासाठी येतात. श्री क्षेत्र नेवासा येथे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे.ज्ञानेश्वरी सांगताना ज्या खांबास टेकून संत ज्ञानेश्वर बसत त्या खांबाला ‘पैस’ असे म्हणतात.
राहता तालुक्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व जाती-धर्मांचे भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्री साईबाबा शिर्डी येथे प्रकट झाल्याचे मानले जाते. द्वारकामाई, गुरूस्थान, श्री साईबाबांनी प्रज्वलित केलेली धुनी, ते बसत असत ती शिळा अशा साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. शिर्डी येथे रोज हजारो लोक श्री साईनाथांचे दर्शन घेतात. धार्मिक महत्त्वामुळे आज या क्षेत्रात गर्दी वाढते आहे व त्यामुळे आनुषंगिक उद्योगही वाढत आहेत. रेल्वेची सोय, विमानतळ यांचाही विकास येथे होत असून शिर्डी हे विकास केंद्र बनत आहे.
राहता तालुक्यात शिर्डीपासून ७ कि. मी. अंतरावर साकुरी येथे कन्याकुमारी आश्रम आहे. श्री साईबाबांचे शिष्य श्री उपासनी महाराज यांनी या आश्रमाची स्थापना केली. येथे वेदाध्ययनाचे प्रशिक्षण घेतलेल्या ब्रह्मचारिणी महिला यज्ञ-याग-पूजा करतात. श्री उपासनी महाराज व सती गोदावरी माताजी यांची समाधी, एकमुखी दत्त मंदिर व शेवग्याच्या झाडावरील स्वयंभू गणपती ही साकुरीतील स्थाने भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
नाथ संप्रदायाशी संबंधित अनेक पवित्र ठिकाणे नगर जिल्ह्यात आहेत. नाथ पंथाचे आदिपीठ वृद्धेश्वर (पाथर्डी तालुका), कानिफनाथांची समाधी असलेले मढी, नगरजवळ डोंगरगण येथील गोरक्षनाथांची समाधी ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मढीमध्ये यात्रेच्या काळात गाढवांचा बाजार भरतो. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी झाला. येथे अहिल्याबाईंनीच बांधलेले शिवमंदिर असून, त्यांचे स्मारकही विकसित करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील शास्त्र-पुराणांचा गाढा अभ्यास असलेले शेख महंमद महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीगोंदा येथे होऊन गेले. शेख महंमद यांची समाधी श्रीगोंदा येथे असून, ते हिंदू व मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे.
अकोले तालुक्यात रतनगड हा पुरातन किल्ला असून याच्या पायथ्याशी ११ व्या शतकात बांधलेले अमृतेश्र्वराचे मंदिर आहे. प्रवरा नदीचा उगम याच भागात आहे. खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांनी जिंकलेल्या शेवटच्या लढाईचा परिसर म्हणून महत्त्वपूर्ण आहे. १७७५ मध्ये मराठ्यांनी येथे निजामावर विजय मिळवला. अकोले तालुक्यातील हरिश्र्चंद्र गडावर हरिश्र्चंद्राचे हेमाडपंती मंदिर आहे. या गडावर मुळा नदीचा उगम असून, याच गडावर चांगदेवांनी तत्त्वसार हा ग्रंथ लिहिला. संगमनेर तालुक्यात पेमगिरी नावाचा वैशिष्ट्यपूर्ण गड आहे या किल्ल्यावर शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला राज्याभिषेक केला होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गडावर सुमारे चार एकर जागा व्यापून टाकणारा प्रचंड, प्राचीन वटवृक्ष आहे. खुद्द नगर शहरातील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. येथे स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय नेत्यांना बंदिवासात ठेवण्यात आले होते, तो कक्ष जतन करण्यात आला आहे.
नगर शहरात कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांची समाधी व पूर्णाकृती पुतळा आहे. शहरातील चांदबीबीचा महालही प्रसिद्ध आहे. अवतार मेहेरबाबा यांची समाधी नगरजवळ अरणगाव (मेहेराबाद) येथे आहे. श्रीमेहेरबाबांनी १९२५ पासून, समाधी घेईपर्यंत (१९६९) मौनावस्था स्वीकारली होती. या ठिकाणी परदेशांतील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. जैन मुनी राष्ट्रसंत आनंदऋषी यांचे वास्तव्य नगरमध्ये होते. त्यांचा जन्मही याच जिल्ह्यातला, पाथर्डी तालुक्यातला. आनंदधाम या नावाने त्यांचे स्मारक आज नगरमध्ये उभे आहे. निसर्गरम्य परिसरामुळे अकोला तालुक्यातील डोंगर रांगांमुळे व प्रवरा नदीवरील धरणामुळे भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. येथे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ' रंधा धबधबा ' निर्माण झाला आहे, तसेच या परिसरातील अंबरेला फॉलही प्रसिद्ध आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात दाट जंगल आहे. या भागात कळसूबाई शिखराच्या व हरिश्र्चंद्रगडाच्या परिसरात वन्यजीव अभयारण्य आहे. येथे ठाकर व महादेव कोळी जमातीचे आदिवासी राहतात. कर्जत तालुक्यात देऊळगाव - रेहेकुरी येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज-माळढोक अभयारण्याचा काही भाग नगर जिल्ह्यातही येतो. माळढोक अभयारण्य नगरमधील कर्जत, श्रीगोंदे व नेवासा या तालुक्यात पसरलेले आहे. जायकवाडी (औरंगाबाद जिल्हा) धरणाचा जलाशयाचा काही भाग नगर जिल्ह्यात असून, येथेही पक्षी अभयारण्य आहे.
अहमदनगर जिल्ह्यात असंख्य वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत.
त्यांपैकी महत्त्वाच्या ठिकाणांची सूची पुढीलप्रमाणे
क्र. ठिकाण तपशील
१ दुर्योधन मंदिर, दुर्गाव (ता. कर्जत) महाराष्ट्रातील एकमेव दुर्योधन मंदिर. जवळ अश्र्वत्थाम्याचे दुर्मीळ मंदिरही आहे.
२ कोल्हारचे भगवतीमाता
मंदिर १३ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिरात देवींची साडेतीन शक्तिपीठे एकवटल्याचे मानले जाते.
३ अगस्ती आश्रम, अकोले येथे अगस्ती ऋषींनी रामायण काळात कृषिविद्या शिकवल्याचे मानले जाते.
४ काशीकेदार
(पाथर्डी-शेवगावच्या सीमेवर) येथे भारतातील रसायन शास्त्राचा प्रवर्तक सिद्धनागार्जून याची समाधी असून काशीकेदारजवळील सोनकडा दरीत हे स्थान आहे.
५ धामोरी
(ता. कोपरगाव) येथे अडबंगीनाथांच्या तपोभूमीजवळ ७५० वर्षांपूर्वीचा गोरखचिंचेचा
विराट वृक्ष आहे. या वृक्षाच्या नऊ मोठ्या फांद्या म्हणजे नऊ-नाथ असे मानले जाते.
६ वडगावदर्याचे लवणस्तंभ
(ता. पारनेर) वडगावदर्या येथे खडकाच्या खोबणीत वरून लोंबकळणारे दगडी स्तंभ आहेत. असे ‘लवण स्तंभ’ जगात फार थोड्या ठिकाणी पाहण्यास मिळतात.
७ निघोज, ता. पारनेर. कुकडी नदीच्या पात्रात येथे प्रवाहामुळे खडक घासले जाऊन नैसर्गिक दगडी खळगे / रांजण खळगे (पॉट होल्स) निर्माण झाले आहेत. आशियातील ही सर्वांत मोठी निसर्गनिर्मित पॉट होल्स आहेत.